वेड वाचनाचे
वेड वाचनाचे
धावत धावत स्टेशनला पोहोचलो. गाडी यायला एक मिनिट होता. बाजूच्या भैय्याचा
’सुक्का भेल” चा स्टॉल खुणावत होता. ट्रेन अगदी प्लॅटफॉर्म वर येत असेल
तरी पण ती थांबायच्या आत अगदी ३०-४० सेकंदात भेळ बनवून तुमच्या हाती पुडा
देण्याचे त्याचे कसब खरंच वाखाणण्यासारखे आहे. गाडीत बसे पर्यंत अर्ध्याहून
जास्त भेळ संपली होती. गाडीत बसलो, आणि हातातला भेळेचा कागद उघडून
वाचणे सुरु केले. काही जन्मजात सवयी असतात, त्या कधीच जात नाहीत , त्यातलीच
ही एक!
माझ्या लहानपणी किराणा सामान हे नाक्यावरच्या एका गुजराथ्या
कडून आणले जायचे. दुकानात तुम्हाला हव्या असलेल्या सामानाची यादी दिली, की
वर्तमान पत्राच्या कागदात त्याच्या पुड्या बांधून तो द्यायचा.’ प्रि पॅक्ड
ग्रोसरी” चा जमाना तेंव्हा आलेला नव्हता. घरी सामान आणल्यावर डब्यात भरून
ठेवल्यावर, रद्दी पेपर वरच्या तुटक बातम्या वाचायची मला सवय होती. बरेचदा
तर कागद फाटलेला असल्याने, अर्धवट बातमी वाचल्यावर, पुढे काय असेल ? ही
रुखरुख पण लागायची, तरीही सवय काही मोडली नाही.
माझा वाचनाचा पिंड
जोपासला गेलाय तो केवळ रद्दी मुळे. रद्दी माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी बरेच
मार्ग वापरते. जसे गाडीवर वडापाव, खारे दाण्याची पुडी, तिकिटं, वगैरे
वगैरे तर आहेतच पण लोकल मधे भिंतीवर चिकटवलेली रद्दी म्हणजे कुठल्यातरी
बाबाच्या, जादू टोणा, मुठ-करणी, वशीकरण वगैरे जाहिराती पण मला वाचायला
चालतात. या जाहिराती म्हणजे पण रद्दीचा प्रकार आहे, फक्त भिंतीवर
चिकटवलेला…. कुठल्याही मार्गाने ’रद्दी” कागद हाती लागल्यावर तो वाचल्या
शिवाय मला अजिबात फेकवत नाही. लहानपणापासून रद्दीच्या दुकानात उभे राहून
तिथे कोणीतरी रद्दी मधे विकलेली कॉमिक्स चाळत उभे रहाण्याची सवय होती मला.
सुदैवाने, त्या दुकानदाराने ही कधी हरकत न घेतल्याने हा वाचनाचा छंद
जास्त जोपासला गेला. माझ्या वाचनाच्या आवडीचे श्रेय त्या रद्दीवाल्याला मी
नक्की देईन.केवळ या रद्दीच्या दुकान मुळेच वेगवेगळ्या विषयावरच्या
पुस्तकांना हात लागला, नाही तर कदाचित वाचनाची आवड निर्माण झालीच नसती.
कधी थोडे पैसे असले, की त्याच रद्दीच्या दुकानातून गुरुनाथ नाईक, बाबूराव
अर्नाळकरांच्या कादंबऱ्या घेऊन वाचायचो. एकदा पुस्तक वाचून झाले की
दुकानदार दहा पैसे दर दिवसाचे लावायचा. थोडक्यात ’रद्दी लायब्ररी”म्हणा ना !
एकदा किराणा दुकानातून सामान आल्यावर लहान पुड्या पुलंच्या
’अपुर्वाई’च्या एका फाडलेल्या पानात बांधलेल्या सापडल्या. जो पर्यंत पुस्तक
शेल्फ मधे असते, तो पर्यंत त्याची किंमत – नाही तर रद्दी! अपुर्वाई पण
रद्दी मधे असू शकते ही कल्पनाच तेंव्हा विचित्र वाटली होती. अजूनही घरच्या
पेपरची रद्दी मी दारावर विकत नाही, तर स्वतः त्या दुकानात घेऊन जातो.
नुकताच रद्दीच्या दुकानात गेलो असता मोरोपंतांची ’केकावल” हे पुस्तक
सापडले, रद्दी वाल्याने त्या ६० पानांच्या दुर्मीळ पुस्तकाची किंमत केवळ
दहा रुपये लावली. बरं ते पुस्तक उघडले, तर त्यावर चक्क लोकसत्ताचे पूर्व
संपादक विद्याधर गोखले यांची स्वाक्षरी दिसली.एखादे पुस्तक, मग ते
कितीही ’वजनदार’ व्यक्तीने लिहिलेले असले तरी फक्त रद्दी च्या दुकानात
किलोच्या भावानेच विकले जाते हे कटू सत्य फार लवकर समजले होते.
पुस्तक हे कधीच रद्दी नसते, तर जो त्याला किलोच्या भावाने विकतो त्याला
त्याची किंमत समजलेली नसते, म्हणून रद्दी मधे विकले जाते. श्रीकृष्णाची
रुक्मिणी आणि सत्यभामेने सुवर्ण तुला केली आणि सगळे सोने एका पारड्यात
टाकले तरीही श्रीकृष्णाचे पारडे खाली राहिले, पण जेंव्हा राधेने त्यावर
तुळशीचे पान ठेवले, तेंव्हा मात्र कृष्णाचे पारडे वर उचलले गेले, तसेच या
रद्दीचे पण आहे, खरी किंमत अजूनही समजलेली नाही……….. आणि इथे फक्त ते
तुळशीचे पान अजूनही सापडलेले नाही.
किरर्र
(संकलन)
No comments:
Post a Comment