आवडीचा पदार्थ

तुझ्या
आवडीचा पदार्थ कोणता ? हा प्रश्नच खरंतर चुकीचा आहे आणि तो विचारणार्याला
उत्तरही अभिप्रेत नसावं असं वाटेल इतका भारहीन आणि भावनाशून्य आहे. मी तर
असल्या प्रश्नाला "तसं काही नाही " हे तद्दन निरर्थक उत्तर भिरकावतो.
खाण्या-पिण्याच्या बाबतीत सढळ आणि मोकळं-ढाकळं वागायचं सोडून इंग्रजाळलेले
म्यानर्स आणि एटीकेट्स कुरवाळत बसणं का रूढ झालं ते कळत नाही. चारचौघात
शिष्टाचार पाळावेत हा संकेत आहे पण अस्खलित मनमोकळेपणा आल्याशिवाय
खाद्य-योग साधेलच कसा?
"तू कुठल्या खाण्यासाठी जीव टाकशील ?"
असं सरळ-सरळ विचारलं जावं आणि "जय भवानी जय शिवाजी" च्या जोशात मी
"पुरणपोळी" पुकारावी असं मला नेहेमी वाटतं. पुरणपोळी ती पुरणपोळीच !
गूळपोळी, खवापोळी, सांजोरी, साटोरी, या सगळ्या तिच्याच बहिणी पण पुरणपोळीची
सर कुणालाही नाही. उत्तम पुरणपोळी करणे हे काही साधं काम नाही. ते तर
"येरा-गबाळ्याचे काम नोहे" ! ते तपश्चर्येचं फळ आहे. एका गृहिणीला म्हणे
उत्तम पुरणपोळया जमल्या, त्याच पुरणपोळ्यांनी तिला राष्ट्रपती पद देऊ केलं
अशी दंतकथाही (?) मी ऐकली आहे.
आमची अन्नपूर्णा आज्जी असेतो मी
यथेच्छ पुरणपोळया हादडल्या. बिडाच्या मोठ्ठ्या काठवाल्या तव्यावर तवाभर
पसरलेली पुरणाची पोळी एकदाही फाटलेली, उसवलेली मी बघितली नाही. पोळीला काठ
आहेत की नाहीत हे कळायचं नाही. पापुद्राही रेशमी कापडासारखा पातळ ! त्यात
जवळपास खाकी रंगाचं अगदी मऊ-सूत जिभेवर विरघळणारं पुरण.(माझं रंगसंगतीचं
ज्ञान इतकं बेताचं आहे की माझी पोच सरकारी रंगाची उपमा देण्यापलीकडे जातच
नाहीये.). माझे गतजन्मीचे काही भोग भोगायचे राहिले असतील म्हणूनच आज्जी
गेल्यावर कित्येक वर्षे बहुतेक करून मूर्तीमंत वैगुण्याने नटलेल्या
पुरणपोळया (त्या पोळ्यांना पुरणपोळ्या म्हणवतही नाही हो ! पण समजून घ्या)
खाव्या लागल्या. मध्येच कधीतरी वाईट महादशेत लहानशी चांगली अंतर्दशा यावी
तशी एखादी चांगली पुरणपोळी नमुन्यापुरतीच मिळायची. सर्वात मोठ्ठं वैगुण्य
म्हणजे साखरेचं पुरण. साखर घालून शॉर्ट-कट पुरण करण्यापेक्षा त्या वाटेला
जाऊच नये. पुरणात गूळच हवा आणि तोही लालसर तपकिरी रंगाचा. गुळाचा खमंगपणा
हाच तर पुरणाचा प्राण आहे हे काय सांगून समजण्यासारखं आहे का ? त्याला
अनुभवच हवा. बागेश्री गाताना, मंद्र निषादावरून शॉर्ट-कट मारून मध्य गंधार
घेतला तर त्या बागेश्रीचा मुडदाच पडेल ना ? तसंच आहे. जाडजूड काठ-पदर,
उसवण, पोळ्या अर्ध्या मोडून ठेवणे, जायफळ उगाळून न घालता किसून घालणे असले
प्रकार एकवेळ क्षम्य आहेत पण तेही पुरण अव्वल असेल तरच. गूळ बारीच चिरायचा
कंटाळा येतो म्हणून पुरणात साखर घालणे (आणि रंग धरावा म्हणून हळद) म्हणजे
चालायचा कंटाळा आला म्हणून व्हील-चेयर घेण्यासारखे आहे.
माझ्या
लग्नानंतर, सुमारे दोन वर्षांनी आम्ही जोडीने एका आज्जींकडे जेवायला गेलो.
पुरणपोळीचा बेत होता. त्यांनी फारच सुरेख पोळ्या केल्या होत्या. मी त्यांना
विचारलं "आज्जी, अध-पाव सरीचं पुरण केलं का हो ?" या प्रश्नावर त्या
इतक्या खुलल्या की ते आजोबांनी बघितलं असतं तर त्यांना पुन्हा प्रपोज केलं
असतं. असो. तर त्यांनी काही वेळ स्वत:चं कौतुक गायलं नंतर सुनेला हे पुरण
जमत नाही म्हणून तक्रारीचा सूर लावला आणि मग म्हणाल्या "सांगलीला जाशील
तेव्हा गजानन मिलच्या धोतरांची चार पानं घेऊन ये. दरवेळेस पुरणपोळया
करायच्या वेळेस मला शोधत बसायला नको." आमच्या संभाषणातला हा भाग बायकोला
बिलकुल कळला नाही. ती अत्यंत चमत्कारिक चेहेर्याने आमचं बोलणं ऐकत होती.
परतताना रिक्षात बसल्या-बसल्या बायकोचा प्रश्न आला "अध-पाव सरीचं पुरण
म्हणजे काय रे ? आणि धोतराचा पुरणपोळ्यांशी काय संबंध ?" मग मी तिला
सर्वोत्तम पुरणपोळया करायची पद्धत सांगितली.
पोळ्यांसाठीचे पुरण
करताना एक किलो डाळीला एक किलो गूळ शिवाय त्यावर अध-पाव सर (म्हणजे जास्त)
गूळ घ्यावा. गूळ बारीकच चिरलेला असावा. खडे ठेऊ नयेत. पुरण चांगलं सरसरीत
शिजवावं घट्ट करू नये, ते यंत्रातून वाटून घ्यावं, मग चौपदरी धोतराच्या
धडप्यातून पुरण पिळून घ्यावं. असं केलं म्हणजे पोळ्या लाटताना सर्र-सर्र
लाटल्या जातात, पुरण सगळीकडे नीट पोचतं. पुरण पिळून निघणार्या गोड
पाण्यापासूनच कटाची आमटी करावी. ते पाणी काढायचं असतं म्हणूनच अध-पाव गूळ
जास्ती घालावा म्हणजे पोळ्या अगोड होत नाहीत. इ.इ.
एव्हढी
कष्टाची, उसाभर कामं केल्यावरच पुरणपोळया चांगल्या होतात हे ऐकल्यावर
बायकोचा धीर खचणार होता. पण मी तिला मदत करण्याचा शब्द दिला आणि त्या
पुढच्या रविवारपासून माझी महादशा संपली आणि उत्कृष्ट पुरणपोळ्या घरी मिळू
लागल्या.
किरर्र
संकलन
श्री. अभिनव फडके यांच्या fb wall वरून साभार ....
No comments:
Post a Comment