Wednesday, June 5, 2013
Wednesday, May 22, 2013
जेंव्हा तुझ्या बुटांना ...
जेंव्हा तुझ्या बुटांना ...
लहानपणी अभ्यास केला नाही, पानातले सगळे विनातक्रार संपवले नाही,
'वेड्यासारखे' वागले की आई-बाबा यऽ यऽ बुकलायचे. स्वयंपाकाच्या ग्यासची
हिरवी रबरी नळी, छडी, झाडू, कमरेचा पट्टा, लाटणे, सांडशी, कपडे वाळत
घालायची काठी यांपैकी कशाकशाचाही काहीही उपयोग होत नाही, हे कळून चुकल्यावर
चपलेने अगर बुटाने मार खाणे ठरलेले असायचे. "जोड्याने हाणले पाहिजे
कार्ट्याला!"असे त्यांच्यापैकी एकानेही जरी म्हटले तरी त्याचा अर्थ आई-बाबा
उभयतांनी हाणणे म्हणजे 'जोड्याने' हाणणे हाच होतो, अशी बालमनाची पक्की
समजूत झालेली. सत्यनारायणाच्या पूजेला जसे मेहूण जेवते (जोडा जेवतो), तसाच
प्रसाद 'जोड्याने' मिळायचा. त्यामुळे अगदी आजतागायत अभ्यास न करणार्या
नतद्रष्ट लहानग्यांपासून ते अगदी अमेरिकेच्या अध्यक्षमहाशयांपर्यंत
कोणालाही 'जोड्याने' हाणले पाहिजे असे कोणी म्हटले की हाणणार्याग किमान दोन
व्यक्ती तरी असाव्यात, असे चित्र आपसूकच उभे राहते. मात्र नजीकच्या
भूतकाळात आमचा हा समज एका इराकी पत्रकाराने चुकीचा ठरवला. त्याने बुश
महाशयांना चढवलेल्या बुटांच्या प्रसादावरून जोड्याने हाणणे म्हणजे एकाच
व्यक्तीने दोन जोडे मारणे हा सुद्धा अर्थ होतो, हे सुद्धा मान्य करावे
लागले. एका अर्थाला दुसर्या अर्थाची जोड (की जोडा) मिळाला.
काही
संस्कृतींमध्ये जोडे फेकून मारणे हे उच्च प्रतीच्या, नीचपणे केलेल्या
अपमानाचे व्यवच्छेदक लक्षण कसे काय असू शकते, हे बाकी आम्हांला अजून
समजलेले नाही. पुण्यात कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त जोडे हाणायची जी
संस्कृती विकसित झाली आहे, तिची लागण या बाकीच्या संस्कृतींना झाली नसावी.
बाटा, लखानी किंवा तत्सम सिंधी-गुजराती चप्पल-बूट विक्रेत्यांचे धंदे
पुण्यात नीटसे चालत नसल्याचे हेच एक मुख्य कारण असावे की तिथे जोडे हाणायचे
असल्यास ते पायात घालावेच लागतात अशातला भाग नाही. तिथला मराठी माणूस जोडे
हाणण्यात पटाईत असल्याने वडेवाले जोशी जरी एकमेवाद्वितीय असले, तरी
जोडेवाले जोशी बरेच आहेत.
चप्पलबुटांची खरी गरज पडते ती मुंबईत. तिथे
कफ परेड, नेपिअन्सी रोड सारख्या उच्चभ्रू वस्त्यांमधली कुत्रीमांजरीही अगदी
रिबिन् बिबिन् लावलेले डिजाइनर् शूज् घालून हिंडताना आम्ही पाहिली आहेत.
वार्धक्याकडे झुकू लागलेल्यांसाठी किंवा नेमाने लाफ्टर् क्लबात,
प्रभातफेरीला (मॉर्निंग् वॉक् !) जिम् मध्ये जाणार्यां साठी स्पोर्ट्स शूज्
; कार्यालयात जाताना, लोकलमधून प्रवास करताना घालायचे चप्पल-बूट वेगळे नि
मंगल कार्यालयात जातानाचे, प्रवासाला जातानाचे वेगळे; महाविद्यालयीन
युवक-युवतींसाठी आठवड्याला जो पोशाख घालायचा त्या प्रत्येक पोशाखामागे एक
या दराने घालायचे चप्पल-बूट आणि सप्ताहाअंतीच्या स्नेहसंमेलनांसाठी,
पार्ट्यांसाठी, ट्रेकिंग-हायकिंग साठीचे, लग्नमुंजीदी समारंभप्रसंगी
घालायचे वेगळे बूट; असा सगळा जय्यत जामानिमा असतो. टाकून दिलेल्या
चपला-बुटांचे पुनर्नवीकरण करायचे, पुनर्निर्माणाचे जे प्रकल्प
धारावीसारख्या उद्योगजगतात आकाराला आले आहेत, त्यांच्या यशामागेही याच
बहुरंगी बहुढंगी पादत्राणांचा फार मोठा हातगुण (की 'पाय'गुण) आहे.
पादत्राणे या शब्दांपासून तयार झालेल्या विशिष्ट शब्दचमत्कृतीची मजा
बालसुलभवयात सगळ्यांनीच घेतलेली आहे, याबाबत दुमत नसावे. पण नेहमीची
बस/ट्रेन पकडण्यासाठी धावताना अथवा ती चुकल्यावरची पायपीट करताना, शेजारी
बसलेल्या किंवा उभे असलेल्या सहप्रवाशाच्या जड ब्यागेचा किंवा त्याच्या
स्वतःच्या जडत्त्वाचा त्रास सहन करताना, टॅक्सी-रिक्षावाल्यांच्या
संपासारख्या बिकट परिस्थितीत तंगडतोड करताना जी पायातले (पादण्यातले नव्हे!
काढलेत ना दात लगेच?!) त्राण कायम ठेवतात ती पादत्राणे हा गर्भितार्थ केवळ
अनुभवातूनच उलगडत जातो.
पूर्वी वधुपित्यांची पादत्राणे त्यांच्यातले
त्राण जिवंत ठेवण्याऐवजी काढून घेत असल्याचे ऐकायला मिळे. मात्र हल्ली
ऑनलाइन् म्याट्रिमोनीज् चे दिवस आल्यापासून हे चित्र आजकालच्या वधूंसारखेच
काहीसे बदलू लागले आहे. पादत्राणांचा उपयोग फोटोत दिसणारी आपली उंची
वाढवण्यासाठी, कोणत्या पोशाखावर कोणते चप्पल-बूट म्याच् होतात हा
'ड्रेसिंग् सेन्स्' दाखविण्यासाठी, आणि झालेच तर लग्नानंतर नवरा व बायको
यांच्यापैकी कोणाच्या पायात किती त्राण उरणार नि कुणाचे किती संपणार, हे
दाखविण्यासाठी केला जाऊ लागला आहे. एकंदरीतच चप्पल-बुटांमधील फ्याशनसंबंधी
कमी पर्याय उपलब्ध असल्याने हा प्रकार वरांपेक्षा वधूंच्या बाबतीतच जास्त
होतो, असे आमचे निरीक्षण आहे. गर्दीत पर्स किंवा गळ्यातली सोनसाखळी चोरणारा
भुरटा चोर, विनाकारण मागे लागणारा रोड् रोमिओ किंवा नवखा, अननुभवी
प्रेमवीर यांना प्रसाद म्हणून चढवायलाही आजकालच्या मुली पादत्राणांचा वापर
करू लागल्या आहेत. त्यामुळे आता 'जुळले मनामनाचे नाते तुझे नि माझे' या
ऐवजी 'जुळले बुटाबुटाचे नाडे तुझे नि माझे'; 'फुलले रे क्षण माऽझे फुलले
रे' ऐवजी 'झिजले रे बुट माऽझे झिजले रे' अशी मंगलगीते कधी ऐकायला मिळणार
याचीच आम्ही वाट पाहत आहोत. अशा बहुपयोगी उपलब्धीचे महत्त्व पटल्यामुळेच
सारसबागेतला गणपती, अरण्येश्वर, पर्वती अशा ठिकाणांहून पादत्राणांच्या
चोर्यां मध्ये लक्षणीय वाढ झाल्याचेही ऐकायला मिळते आहे.
मागे
भारताच्या माननीय गृहमंत्र्यांना बूट फेकून आपल्या इराकी मित्राचे
अंधानुकरण करण्याचा चावटपणा एका शीख पत्रकाराने केल्याचे पाहण्यात आले. पण
मुळातच शीख बाणा हा बुटासारखे तुच्छ हत्यार न वापरता लढवय्या वृत्तीने
सीमेवर छातीचे कोट करून बंदुका चालवायचा (किंवा भारतात ट्रक नि
अमेरिकेत-क्यानडात टॅक्सी चालवायचा) आहे. त्यामुळे इराकी पत्रकाराच्या बूट
फेकण्यातला तो जोश या मा. पत्रकार सरदारजींच्या जोडा हाणण्यात दिसून आला
नाही. आणि सदैव हसतमुख नि शांत असणारे आदरणीय गृहमंत्री सुरुवातीला जरी
त्या अनपेक्षित प्रीतीसुमनांनी किंचित गांगरल्यासारखे वाटत असले, तरीसुद्धा
पाडगावकरांच्या 'जेंव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा' च्या चालीवर
'जेंव्हा तुझ्या बुटांना उडवी दलेर माझा' असे काहीसे त्यांना सुचले
असण्याची शक्यता त्यांच्या मिस्किल हसण्यावरून तरी अगदीच नाकारता यायची
नाही.
किरर्र
(संकलन)
Thursday, May 16, 2013
खूप मोठा हो ....!
खूप मोठा हो....!
आपल्याकडं
एखाद्या लहानानं नमस्कार केला तर मोठी माणसं आशीर्वाद देताना म्हणायची, '
चांगलं शीक, खूप मोठा हो '. मग ही मुलं-मुली शिकायची, नोकरी-व्यवसाय
करायची, श्रीमंत व्हायची, स्थिर व्हायची. कालक्रमानं त्यांना वयाचं मोठेपण
यायचं. त्यांचे बाप व्हायचे, आया व्हायच्या. आजी-आजोबा, मामा-माम्या,
दादा-वहिनी... आणखी बरंच काही. यात नेतेबिते होणंही आलंच. शिक्षणाचं
रूपांतर पैशात, वस्तूत व्हायचं, पण या सगळ्यात ' मोठं होण्याच्या
प्रकल्पाचं ' काय व्हायचं कुठास ठाऊक ? बहुधा आशीर्वाद देणारेही याचा फारसा
विचार करायचे नाहीत. त्यांच्यासमोर नवं मूल, नवा आशीर्वाद ' चांगलं शीक,
खूप मोठा हो '.
आशीर्वाद भावनेनं ओथंबलेला असायचा. देणाऱ्याच्या
स्नेहानं तो आर्द्र झालेला असे, पण ' मोठं होणं म्हणजे काय होणं '? याचा
उलगडा या स्नेहातून व्हायचा नाही. मग या मोठं होण्याच्या प्रकल्पात जाऊ
बघणाऱ्या मुलांवर भव्यतेचा मारा सुरू व्हायचा. इतिहासामधली भव्यता,
भूतकाळातली भव्यता, संस्कृतीची भव्यता, धार्मिक भव्यता या सगळ्या
भव्यतांमध्ये प्रतिमा असायच्या. नायकांच्या, प्रेषितांच्या, ईश्वराच्या
प्रतिमा. हळूहळू भव्यतांच्या प्रतिमापूजनात आपण हरवून जायचो. आशीर्वादाचे
पाणी वाहून गेलेले. सुखी आणि समृद्ध असण्याच्या जमिनीत आपली मुळं इतकी घट्ट
रूजलेली की, आपण इतिकर्तव्यतेच्या भावनेत बुडून गेलेलो. आपली अशी पक्की
धारणा झालेली की, आपल्याला व्हायचं तितकं मोठं आपण झालोय, आता करण्यासारखं
काही शिल्लक नाही. मग भव्यतेच्या प्रतिमांचे उत्सव, त्यांचे जयजयकार मोठं
होण्याच्या प्रकल्पात उतरूनही आपण खुजे राहिलोत या बोचणीवर मात करण्यासाठी,
आपल्याला मोठेपणाचा अर्थ न कळण्याचा अपराधभाव दडपण्यासाठी, अधिक मोठ्या
प्रतिमा, अधिक मोठे उत्सव, सतत नव्या प्रेषितांचा शोध. प्रतिमा, पुतळे
गगनाला भिडलेले. त्यांच्यासाठी आपण हळवे, आक्रमक आणि चिथावणीखोर झालेलो.
अनंत काणेकरांचं ' विजेची वेल ' नावाचं एक ललित गद्याचं छोटंसं पुस्तक
आहे. त्यात एक लेख आहे, ' मोठ्ठं. त्याहून मोठ्ठं '. त्यात त्यांनी या मोठं
होण्याच्या पोकळ जाणीवहीन स्पर्धेविषयी लिहिलंय. काणेकरांनी लिहिलंय, '
खरोखरच मोठ्ठं मोठ्ठं करीत, मोठ्ठ्याच्या मागं खुळ्यासारखं धावण्यात काहीच
अर्थ नाही. मोठी यंत्रं, मोठी शहरं, मोठ्या योजना, सर्वच मोठ्ठं करण्याच्या
नादात, ज्या छोट्याशा माणूस नावाच्या प्राण्यासाठी हे सर्व चाललेलं असतं,
तो बिचारा शिल्लकच राहत नाही. '
काणेकर लिहितात तेच आपल्या
वर्तमानालाही लागू नाही का?. स्वतःच्या मोठं होण्याचे सोयीस्कर अर्थ लावले.
खुजं राहण्याची चतुर समर्थनं शोधली. आपलं मोठं होणं म्हणजे प्रस्थापित
होणं, सुबत्ता मिळवणं, पदांवरची - संपत्तीवरची अढळपदं मिळवणं, कुटुंबावर
आणि आप्तांवर दबदबा मिळवणं. हितसंबंधांचं आणि सुरक्षिततेचं भक्कम जाळं उभा
करणं, ते राखणं. मग एकांतात स्वतःचाच स्वतःला त्रास होऊ नये म्हणून भव्य
प्रतिमांच्या पूजनाचे मायाजाल उभारणं. पण ही मोठं होण्याची तृष्णा कधीच
संपत नाही. आपण जितक्या भव्य प्रतिमा उभारू तितके आपण जास्त खुजे दिसू.
इमारत जितक्या उंच होत जातील तितका आपला कणा ठिसूळ होत जाईल. ज्या भव्यतेचा
आपण अभिमान बाळगतोय ती कराल हास्य करीत आपल्यावर चालून येईल. आपलं शरीर
लठ्ठ असेल, पण आपली प्रकृती नाजूक होईल.
काणेकर लिहितात, '
एकमेकांना खाण्याचा प्रयत्न न करता एकमेकांशी मिळून मिसळून राहण्यातच मजा
आहे. ' हे एकमेक म्हणजे फक्त माणसं नव्हेत, सर्व स्थिरचर सृष्टी. आपल्या
भक्ष्यांच्या विरोधात मोठमोठे जमाव जमवणं, या जमावांच्या दबावांनी आपली
खाणी-गिळणी न्याय ठरवणं, मोठं होण्याच्या सगळ्या आशीर्वादांचा भ्रमनिरास
असेल. खरं, अंतःकरणपूर्वक ' मोठं हो ' म्हणणं म्हणजे, ' तुझा पैस रूंदावू
दे, तुझ्या आलिंगनाची कक्षा रुंदावू दे, भेदाभेदांचा आणि हव्यासाचा अंधार
वितळून संवेदनेच्या मायाळू उजेडात तुला सगळं जग दिसू दे. लहानपणाची सार्थता
कळून खुजेपणाची व्याधी सरू दे ' असं म्हणणं. अशा सदिच्छांनी आपला माथा
उन्नत असो आणि अशा आशीर्वादांनी आपले भविष्य उजळून निघो.
किर्रर्र
(संकलन)
Tuesday, May 14, 2013
लहानपण देगा देवा
लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा…
आपले वय काय हो? असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते? मुलींना
हा प्रश्न सहसा आवडत नाही. काहींना सरळ उत्तर द्यावेसे वाटेलही. जेष्ठ
मंडळी लगेच मनातल्या मनात आता रिटायरमेंटला किती वर्ष राहिले बुवा आणि अजून
किती ’सर्व्हिस’ शिल्लक आहे याचाही हिशोब करायला लागतात. पण वय कितीही
असले तरी प्रत्येकात एक लहान मूल लपलेले असते. आता काही म्हणतील छे… काही
तरीच काय? पण माझे ऐका, आता मान्य कराच हे. तुम्ही कितीही म्हणालात तरी हे
अगदी ख्खरं आहे. तेच लहान मूल ज्याला कधी कधी फार खोड्या कराव्याशा वाटतात.
कित्येकदा मला असे वाटलंय की एकदा तरी खूप जोरात ओरडून आरोळ्या ठोकाव्यात.
उगाचच… काही कारण नसताना. का कुणास ठाऊक, पण वाटते. ट्रेकला गेलो की ही
हौस मी भागवून घेतो. मला आठवतंय की ’कळसूबाईच्या नादखुळा ट्रेक’मध्ये
शिखरावर पोचल्यावर मी पहिली गोष्ट केली ती म्हणजे जोरजोरात बोंब ठोकली अगदी
इंग्लिशमध्ये scream म्हणतात तसे. शिवाय उगाचच इकडे तिकडे सैरावैरा धावून
घेतले. आहे ना गंमत?
कधी आपल्याला वाटतेच ना रस्त्यात उगाचच एखाद्या
गाडीला ’कट’ मारावा. अचानक कुणी मधे आले आणि मूड चांगला असला की आपण ओ
काकू, ए मावशे जरा समोर पाहा, अप्पा जरा हळू असे खोडकर शब्द वापरतो.
चौकातल्या पोलीसमामाची ढेरी फारच गरगरीत दिसते आणि त्यावर हळूच हात
फिरवावासा वाटतो. कुणी तंबाखू चोळत उभा असला तर खालून हाताला धक्का
मारावासा वाटतो.
अजूनही किती तरी वेळा आपण कुणी बसायच्या आधी त्याची
खुर्ची हळूच ओढून बाजूला करतो. खूप दिवसांनी कुणाला भेटून सरप्राईज द्यायचे
असेल तर मागून जाऊन त्याचे/तिचे डोळे गच्च झाकतो अथवा “भॉ” करतो. कुणाला
खाली बसताना पाहिले की च्युइंगम ठेवावेसे वाटते ना तुम्हांला.
कॉलेजला
असताना खूप वेळा बसमध्ये सीटच्या मधून खाली येणाऱ्या मुलींच्या ओढणीने
आम्ही आमचे बूट पुसण्याचे उद्योग करायचो. किंवा शेजारी उभा असलेला माणूस
तिकडे तोंड करुन उभा असेल तर हळूच त्याच्या शर्टच्या कापडाची क्वालिटी
पाहून घ्यायचो.
कधी मनात आले की आपण उगाच हॉटेलमध्ये टिश्यू पेपरचे
विमान, होडी असले काही बाही बनवतो आणि मग वेटर आपल्याकडे ’जरा हाललंय’ अशा
नजरेने पाहतो. कितीही गंभीर सिनेमा असला तरी मला अजूनही पॉपकॉर्नची पिशवी
फोडल्याशिवाय पैसे वसूल झाल्यासारखे वाटतच नाही. चित्रपट संपल्यावर
कॉरिडॉरमधून बाहेर पडताना लोक इतके गप्प गप्प का असतात हे तर मला अजूनही
कोडे उलगडले नाही. अशा वेळी मला ’इतना सन्नाटा क्यू है भाई’ अशी काडी लावून
खो-खो हसावेसे वाटते. बागेत गेले की कधी उगाचच झोक्यावर बसावेसे वाटते
किंबहुना अशा लोकांसाठीच ’खेळणी फक्त लहान मुलांसाठी आहेत’ असे फलक लावलेले
असावेत. मग आपण हिरवळीवर लोळून हौस पूर्ण करुन घेतो. बागेतला फुगेवाला
फुगा फुगवत असताना त्याला गुपचुप टाचणी मारावीशी वाटते.
मानवाला
सततच्या आपल्या या बालसवयींची काळजी खूप प्राचीन काळापासून पडली असावी.
म्हणूनच आपल्या लग्नात नवऱ्या मुलाचे कान पिळणे, बूट पळवणे, हळद खेळणे,
वरमाईच्या डोक्यावर कुरड्या फोडणे असे प्रकार शास्त्रसंमत आहेत. वाजंत्री
पथकातल्या पिपाणीवाल्यासमोर चिंचेचे बोटूक चोखायचे तर माझे कितीतरी
दिवसांपासूनचे स्वप्न आहे. अगदी कॉर्पोरेट क्षेत्रातल्या सो कॉल्ड
पर्सनालिटी डेव्हलपमेंटच्या गेममध्ये पण थोडा का होईना बालिशपणाचा अंश
असतो. अगदी उच्च सुपरब्रॅंडच्या जाहिराती सुद्धा कित्येकदा या
बालिशपणाभोवतीच घुटमळत असतात. किंबहुना अशाच जाहिराती खूप दिवस लक्षात
राहतात. विश्वास नसेल तर ती ’धारा’ची “जलेबी…?” जाहिरात आठवा. टेलिव्हिजन
क्षेत्राने तर आपली ही मेख केव्हाच ओळखली आहे, म्हणून तर आजकाल कित्येक
कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी लहान मुलांवर टाकली आहे.
लहान मुलांमध्येच आपला जीव रमतो ना अजूनही? जगरहाटीच्या रॅटरेसमधून घरी
गेल्यावर आपण घरात किंवा शेजारी लहान मूल असेल तर त्याच्या बरोबर मूल होऊन
खेळतोच ना? (मी तरी खेळतो, आणि मला लहान व्हावेसे वाटते. पण त्या आमच्या
शेजारच्या लहान मुलाला मोठे व्हावेसे वाटते. मला ऑफिसला जाताना विचारतो,
पप्पू काका, टिफीन घेतला का? बॉटल भरुन घेतली का?”) मला सांगा कितीही आपण
मोठे झालो तरी आपली टॉम अँड जेरी पाहायची सवय जाईल का? चॅनल सर्फ करताना
कार्टून फिल्म्स दिसल्यावर आपण थबकतोच ना? किती तरी वेळा कुणाशी तरी मिस
कॉलचा खेळ खेळत बसतो तोही या पोरकटपणापायीच. मी तर आजवर अशा अगणित खोड्या
केल्या आहेत, अजूनही करत आहे आणि पुढेही करत राहणार यात तिळमात्र शंका
नाही.
किर्रर्र
(संकलन)
Saturday, May 4, 2013
वेड वाचनाचे
वेड वाचनाचे
धावत धावत स्टेशनला पोहोचलो. गाडी यायला एक मिनिट होता. बाजूच्या भैय्याचा
’सुक्का भेल” चा स्टॉल खुणावत होता. ट्रेन अगदी प्लॅटफॉर्म वर येत असेल
तरी पण ती थांबायच्या आत अगदी ३०-४० सेकंदात भेळ बनवून तुमच्या हाती पुडा
देण्याचे त्याचे कसब खरंच वाखाणण्यासारखे आहे. गाडीत बसे पर्यंत अर्ध्याहून
जास्त भेळ संपली होती. गाडीत बसलो, आणि हातातला भेळेचा कागद उघडून
वाचणे सुरु केले. काही जन्मजात सवयी असतात, त्या कधीच जात नाहीत , त्यातलीच
ही एक!
माझ्या लहानपणी किराणा सामान हे नाक्यावरच्या एका गुजराथ्या
कडून आणले जायचे. दुकानात तुम्हाला हव्या असलेल्या सामानाची यादी दिली, की
वर्तमान पत्राच्या कागदात त्याच्या पुड्या बांधून तो द्यायचा.’ प्रि पॅक्ड
ग्रोसरी” चा जमाना तेंव्हा आलेला नव्हता. घरी सामान आणल्यावर डब्यात भरून
ठेवल्यावर, रद्दी पेपर वरच्या तुटक बातम्या वाचायची मला सवय होती. बरेचदा
तर कागद फाटलेला असल्याने, अर्धवट बातमी वाचल्यावर, पुढे काय असेल ? ही
रुखरुख पण लागायची, तरीही सवय काही मोडली नाही.
माझा वाचनाचा पिंड
जोपासला गेलाय तो केवळ रद्दी मुळे. रद्दी माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी बरेच
मार्ग वापरते. जसे गाडीवर वडापाव, खारे दाण्याची पुडी, तिकिटं, वगैरे
वगैरे तर आहेतच पण लोकल मधे भिंतीवर चिकटवलेली रद्दी म्हणजे कुठल्यातरी
बाबाच्या, जादू टोणा, मुठ-करणी, वशीकरण वगैरे जाहिराती पण मला वाचायला
चालतात. या जाहिराती म्हणजे पण रद्दीचा प्रकार आहे, फक्त भिंतीवर
चिकटवलेला…. कुठल्याही मार्गाने ’रद्दी” कागद हाती लागल्यावर तो वाचल्या
शिवाय मला अजिबात फेकवत नाही. लहानपणापासून रद्दीच्या दुकानात उभे राहून
तिथे कोणीतरी रद्दी मधे विकलेली कॉमिक्स चाळत उभे रहाण्याची सवय होती मला.
सुदैवाने, त्या दुकानदाराने ही कधी हरकत न घेतल्याने हा वाचनाचा छंद
जास्त जोपासला गेला. माझ्या वाचनाच्या आवडीचे श्रेय त्या रद्दीवाल्याला मी
नक्की देईन.केवळ या रद्दीच्या दुकान मुळेच वेगवेगळ्या विषयावरच्या
पुस्तकांना हात लागला, नाही तर कदाचित वाचनाची आवड निर्माण झालीच नसती.
कधी थोडे पैसे असले, की त्याच रद्दीच्या दुकानातून गुरुनाथ नाईक, बाबूराव
अर्नाळकरांच्या कादंबऱ्या घेऊन वाचायचो. एकदा पुस्तक वाचून झाले की
दुकानदार दहा पैसे दर दिवसाचे लावायचा. थोडक्यात ’रद्दी लायब्ररी”म्हणा ना !
एकदा किराणा दुकानातून सामान आल्यावर लहान पुड्या पुलंच्या
’अपुर्वाई’च्या एका फाडलेल्या पानात बांधलेल्या सापडल्या. जो पर्यंत पुस्तक
शेल्फ मधे असते, तो पर्यंत त्याची किंमत – नाही तर रद्दी! अपुर्वाई पण
रद्दी मधे असू शकते ही कल्पनाच तेंव्हा विचित्र वाटली होती. अजूनही घरच्या
पेपरची रद्दी मी दारावर विकत नाही, तर स्वतः त्या दुकानात घेऊन जातो.
नुकताच रद्दीच्या दुकानात गेलो असता मोरोपंतांची ’केकावल” हे पुस्तक
सापडले, रद्दी वाल्याने त्या ६० पानांच्या दुर्मीळ पुस्तकाची किंमत केवळ
दहा रुपये लावली. बरं ते पुस्तक उघडले, तर त्यावर चक्क लोकसत्ताचे पूर्व
संपादक विद्याधर गोखले यांची स्वाक्षरी दिसली.एखादे पुस्तक, मग ते
कितीही ’वजनदार’ व्यक्तीने लिहिलेले असले तरी फक्त रद्दी च्या दुकानात
किलोच्या भावानेच विकले जाते हे कटू सत्य फार लवकर समजले होते.
पुस्तक हे कधीच रद्दी नसते, तर जो त्याला किलोच्या भावाने विकतो त्याला
त्याची किंमत समजलेली नसते, म्हणून रद्दी मधे विकले जाते. श्रीकृष्णाची
रुक्मिणी आणि सत्यभामेने सुवर्ण तुला केली आणि सगळे सोने एका पारड्यात
टाकले तरीही श्रीकृष्णाचे पारडे खाली राहिले, पण जेंव्हा राधेने त्यावर
तुळशीचे पान ठेवले, तेंव्हा मात्र कृष्णाचे पारडे वर उचलले गेले, तसेच या
रद्दीचे पण आहे, खरी किंमत अजूनही समजलेली नाही……….. आणि इथे फक्त ते
तुळशीचे पान अजूनही सापडलेले नाही.
किरर्र
(संकलन)
Wednesday, April 24, 2013
यशस्वी
यशस्वी
यश म्हणजे काय? याविषयावर हल्ली माझं माझ्याशीच कडाक्याचं भांडण व्हायला
लागलंय. आपण ज्या वाटेवरून चाललोय, त्या वाटेवर सध्या तर कौतुकच कौतुक
वाट्याला येतंय आपल्या.. मग बाकीच्या मित्र मैत्रिणींच्या वाट्याला ते थोडं
जास्त येतंय हे दिसल्यावर पोटात का दुखतं आपल्या? प्रत्येकाचा स्वतःचा असा
एक 'पेस' असतो... आणि त्यात सामावणारी प्रत्येकाची एक 'स्पेस' असते.. हे
सगळं कळत असून 'यश' खेचून घ्यायचा अट्टाहास का चाललाय? कुठल्याही
कार्यक्रमानंतर 'कार्यक्रम छान झाला' , यापेक्षा "आज पाकीट आपल्याला किती,
आणि 'त्याला' किती इतका घाणेरडा विचार का येतोय डोक्यात? तरी बरं, आत्ता
कुठे सुरुवात होते आहे करियरला... जगण्याला. पण 'जगणं' नेमकं कळायच्या आधीच
ही तुटत जाण्याची जाणीव कशामुळे येतेय? स्पर्धा, असुरक्षितता या सगळ्यात
जे खरंच मिळवायचंय ते मिळतंय का नुसताच आभास आहे यशाचा? आपणच आपल्या भोवती
विणून घेतलेला किती भयानक कोश आहे हा.
हवं तेव्हा, हवं तितकं खळखळून हसता येणं म्हणजे यश नाही?
मान्यवरांनी पाठीवर शाबासकीची थाप देणं म्हणजे यश नाही?
प्रामाणिक समीक्षकांकडून कौतुकाची दाद येणं म्हणजे यश नाही?
जवळच्या मित्रांना आपल्याकडे कधीही मन मोकळं करता येण्याचा विश्वास वाटणं म्हणजे यश नाही?
जवळच्या मित्राने केलेला आघात विसरून त्याच्यावर तरीही प्रेम करता येणं, म्हणजे यश नाही?
एखादी सुंदर कविता, लेख, चित्रपट, शिल्प, चित्र यांचा आनंद घेता येणं, सौंदर्याचं कौतुक करता येणं म्हणजे यश नाही?
आपल्या प्रतिस्पर्ध्यामधलं चांगलं शोधता येणं म्हणजे यश नाही?
आपल्यामुळे किमान एक तरी जीव रात्री हसून झोपतो हे समाधान, म्हणजे यश नाही?
हे सगळं जमत होतं आपल्याला, अगदी आत्ताआत्तापर्यंत. मग तेव्हाच खरंतर
जास्त यशस्वी होतो आपण असं म्हणायला हवं.. ही भूक, ही वखवख का? कुठून आली
ती? कोणासाठी आहे आहे ती? माझ्यासाठी? पण मग मी तर खूप आनंदात असायला हवं.
माझ्याचसाठी तर चाललंय सारं काही..
तसं होत मात्र नाही.. मग एक
त्याचंही एक वेगळंच फ्रस्ट्रेशन. आणि पुन्हा लोकांच्या सहानुभूतीवर आपला
अधिकारच आहे, अशी स्वतःचीच समजूत घालून घेणं. हे का लक्षात येत नाही की
आपल्याला जे वाटतं, ते आपल्यासोबत जे घडतं त्यामुळे नाही. कारण आपण गोष्टी
नेहमीच आपल्याला हव्या तशा इंटरप्रिट करू पाहतो. त्यांचं प्रत्यक्षातलं रूप
आपल्याला बघायचं नसतं. मग त्या आभासी विश्वात रमणं सुरु होतं. आणि तेच
आवडायला लागतं हळूहळू. कारण सरळ आहे, तसं करणं सोपं असतं. तिथे खऱ्याखुऱ्या
प्रश्नांचा सामना करायचा नसतो. आपल्या पळपुटेपणा झाकायचा तो उपाय होऊन
जातो.. पुढे जाऊन त्याची ज्यांना त्याची सवय होते, आणि जे असे सराईत पणे
वागायला शिकतात त्यांना आपण 'यशस्वी' अशी उपाधी देऊन टाकतो. आणि मग
त्यांच्या 'सर्कल' मध्ये शिरायची धडपड करत राहतो. या पद्धतीने 'यशस्वी'
होणं तसं फार अवघड नाहीये. दोनच गोष्टी कराव्या लागतात. एक, तुम्हाला नक्की
काय हवंय हे ठरवायचं. आणि मग त्यासाठी जी किंमत द्यावी लागेल, ती द्यायची.
ती किंमत तुमचं समाधान, संसार, तत्त्वं, मन, यापैकी काहीही असू शकते. हे
जमलं की मग आलंच सगळं!
माझा प्रॉब्लेम जरा वेगळा आहे. मला यशस्वीही
व्हायचंय आणि ही किंमतही द्यायची नाहीये. त्यामुळे मी सध्या उलटा विचार
सुरु केलाय.. 'समाधानी' होऊ शकेन का, याचा.. बघूया, त्यात 'यशस्वी' होता
येतंय का ते. कारण इतकी खात्री आहे, की हे यश कायमचं टिकणारं असेल. माझं
हसू हिरावणारं नाही, तर ते आणखी खुलवणारं असेल!
किरर्र
(संकलन)
Wednesday, April 17, 2013
मल्टी टास्किंग
मल्टी टास्किंग
प्रकृती
नर-नारी, तसच पुरुष आणि प्रकृती ही स्त्री-पुरुष जोडीची नांव!
यातील स्त्रीदर्शक "प्रकृती" हे नामाभिधान किती स्थितिदर्शक आणि स्तुत्य आहे!
स्त्रिया सतत क्रियाशीलच असतात याचे निदर्शन "प्र"ने होते. सतत विचार-योजना आणि कृती हा तिच्या जीवनाचा स्थायीभाव!
मासिक पाळीची निवृत्ती होईपर्यंत एकतर तिला सहसः आजारी असलेल
क्वचितच पहाव लागत. यात कौटुंबिक जबाबदारी आणि लहानग्यांची गरज हे
मुख्य कारण असतच. मग ओघानेच त्या गरजाना पुरे पडायला बाजारहाट,
खरेद्या आल्याच! त्यातही अकल्पनीय वैविध्य असताच, शाळेबरोबरच
बाहेरचे, प्रसंगानुरूप घालायचे कपडे, आवडीचे खाद्य पदार्थ, भेट
वस्तू, स्वतःच्या साड्या, ड्रेसेस, कॉस्मेटिक्स, पर्सेस याचबरोबर
नवरा-दीर-भाऊ, आई-वडील, सासू-सासरे, नणंद-भावजया यांच्यासाठी
नैमित्तिक खरेदीही येते. आश्चर्याची
गोष्ट म्हणजे तिने प्रत्येकाची मापे जोखालेली असतात, आवड-निवड
आत्मसात केलेली असते, हे कमीच की काय म्हणून प्रत्येकीच्या घरात
"नसलेल्या" वस्तूंची यादीही तिच्या कॉम्पुटर मध्ये सुरक्षित असते
आणि यातील नेमकी गोष्ट नेमक्या प्रसंगीच्या खरेदीत तिला "नेमकी
आठवते"!
खरच हे व्यवस्थापन "अद्वितीय"च आहे आणि "आई"च्या छायेत मोठी होत असलेली प्रत्येक "लेक" यात वाकबगारच असते!
किरर्र
संकलन
Subscribe to:
Posts (Atom)


