Wednesday, April 24, 2013

यशस्वी

यशस्वी
 
यश म्हणजे काय? याविषयावर हल्ली माझं माझ्याशीच कडाक्याचं भांडण व्हायला लागलंय. आपण ज्या वाटेवरून चाललोय, त्या वाटेवर सध्या तर कौतुकच कौतुक वाट्याला येतंय आपल्या.. मग बाकीच्या मित्र मैत्रिणींच्या वाट्याला ते थोडं जास्त येतंय हे दिसल्यावर पोटात का दुखतं आपल्या? प्रत्येकाचा स्वतःचा असा एक 'पेस' असतो... आणि त्यात सामावणारी प्रत्येकाची एक 'स्पेस' असते.. हे सगळं कळत असून 'यश' खेचून घ्यायचा अट्टाहास का चाललाय? कुठल्याही कार्यक्रमानंतर 'कार्यक्रम छान झाला' , यापेक्षा "आज पाकीट आपल्याला किती, आणि 'त्याला' किती इतका घाणेरडा विचार का येतोय डोक्यात? तरी बरं, आत्ता कुठे सुरुवात होते आहे करियरला... जगण्याला. पण 'जगणं' नेमकं कळायच्या आधीच ही तुटत जाण्याची जाणीव कशामुळे येतेय? स्पर्धा, असुरक्षितता या सगळ्यात जे खरंच मिळवायचंय ते मिळतंय का नुसताच आभास आहे यशाचा? आपणच आपल्या भोवती विणून घेतलेला किती भयानक कोश आहे हा.
हवं तेव्हा, हवं तितकं खळखळून हसता येणं म्हणजे यश नाही?
मान्यवरांनी पाठीवर शाबासकीची थाप देणं म्हणजे यश नाही?
प्रामाणिक समीक्षकांकडून कौतुकाची दाद येणं म्हणजे यश नाही?
जवळच्या मित्रांना आपल्याकडे कधीही मन मोकळं करता येण्याचा विश्वास वाटणं म्हणजे यश नाही?
जवळच्या मित्राने केलेला आघात विसरून त्याच्यावर तरीही प्रेम करता येणं, म्हणजे यश नाही?
एखादी सुंदर कविता, लेख, चित्रपट, शिल्प, चित्र यांचा आनंद घेता येणं, सौंदर्याचं कौतुक करता येणं म्हणजे यश नाही?
आपल्या प्रतिस्पर्ध्यामधलं चांगलं शोधता येणं म्हणजे यश नाही?
आपल्यामुळे किमान एक तरी जीव रात्री हसून झोपतो हे समाधान, म्हणजे यश नाही?

हे सगळं जमत होतं आपल्याला, अगदी आत्ताआत्तापर्यंत. मग तेव्हाच खरंतर जास्त यशस्वी होतो आपण असं म्हणायला हवं.. ही भूक, ही वखवख का? कुठून आली ती? कोणासाठी आहे आहे ती? माझ्यासाठी? पण मग मी तर खूप आनंदात असायला हवं. माझ्याचसाठी तर चाललंय सारं काही..
तसं होत मात्र नाही.. मग एक त्याचंही एक वेगळंच फ्रस्ट्रेशन. आणि पुन्हा लोकांच्या सहानुभूतीवर आपला अधिकारच आहे, अशी स्वतःचीच समजूत घालून घेणं. हे का लक्षात येत नाही की आपल्याला जे वाटतं, ते आपल्यासोबत जे घडतं त्यामुळे नाही. कारण आपण गोष्टी नेहमीच आपल्याला हव्या तशा इंटरप्रिट करू पाहतो. त्यांचं प्रत्यक्षातलं रूप आपल्याला बघायचं नसतं. मग त्या आभासी विश्वात रमणं सुरु होतं. आणि तेच आवडायला लागतं हळूहळू. कारण सरळ आहे, तसं करणं सोपं असतं. तिथे खऱ्याखुऱ्या प्रश्नांचा सामना करायचा नसतो. आपल्या पळपुटेपणा झाकायचा तो उपाय होऊन जातो.. पुढे जाऊन त्याची ज्यांना त्याची सवय होते, आणि जे असे सराईत पणे वागायला शिकतात त्यांना आपण 'यशस्वी' अशी उपाधी देऊन टाकतो. आणि मग त्यांच्या 'सर्कल' मध्ये शिरायची धडपड करत राहतो. या पद्धतीने 'यशस्वी' होणं तसं फार अवघड नाहीये. दोनच गोष्टी कराव्या लागतात. एक, तुम्हाला नक्की काय हवंय हे ठरवायचं. आणि मग त्यासाठी जी किंमत द्यावी लागेल, ती द्यायची. ती किंमत तुमचं समाधान, संसार, तत्त्वं, मन, यापैकी काहीही असू शकते. हे जमलं की मग आलंच सगळं!
माझा प्रॉब्लेम जरा वेगळा आहे. मला यशस्वीही व्हायचंय आणि ही किंमतही द्यायची नाहीये. त्यामुळे मी सध्या उलटा विचार सुरु केलाय.. 'समाधानी' होऊ शकेन का, याचा.. बघूया, त्यात 'यशस्वी' होता येतंय का ते. कारण इतकी खात्री आहे, की हे यश कायमचं टिकणारं असेल. माझं हसू हिरावणारं नाही, तर ते आणखी खुलवणारं असेल!
किरर्र 
(संकलन)

Wednesday, April 17, 2013

मल्टी टास्किंग


मल्टी टास्किंग 
प्रकृती
 
नर-नारी, तसच पुरुष आणि प्रकृती ही स्त्री-पुरुष जोडीची नांव!
यातील स्त्रीदर्शक "प्रकृती" हे नामाभिधान किती स्थितिदर्शक आणि स्तुत्य आहे!
स्त्रिया सतत क्रियाशीलच असतात याचे निदर्शन "प्र"ने होते. सतत विचार-योजना आणि कृती हा तिच्या जीवनाचा स्थायीभाव!
मासिक पाळीची निवृत्ती होईपर्यंत एकतर तिला सहसः आजारी असलेल क्वचितच पहाव लागत. यात कौटुंबिक जबाबदारी आणि लहानग्यांची गरज हे मुख्य कारण असतच. मग ओघानेच त्या गरजाना पुरे  पडायला बाजारहाट, खरेद्या आल्याच!  त्यातही अकल्पनीय वैविध्य असताच, शाळेबरोबरच बाहेरचे, प्रसंगानुरूप घालायचे कपडे, आवडीचे खाद्य पदार्थ, भेट वस्तू, स्वतःच्या साड्या, ड्रेसेस, कॉस्मेटिक्स, पर्सेस याचबरोबर नवरा-दीर-भाऊ, आई-वडील, सासू-सासरे, नणंद-भावजया यांच्यासाठी नैमित्तिक खरेदीही येते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने प्रत्येकाची मापे जोखालेली असतात, आवड-निवड आत्मसात केलेली असते, हे कमीच की काय म्हणून प्रत्येकीच्या घरात "नसलेल्या" वस्तूंची यादीही तिच्या कॉम्पुटर मध्ये सुरक्षित असते आणि यातील नेमकी गोष्ट नेमक्या प्रसंगीच्या खरेदीत तिला "नेमकी आठवते"!
खरच हे व्यवस्थापन "अद्वितीय"च आहे आणि "आई"च्या छायेत मोठी होत असलेली प्रत्येक "लेक" यात वाकबगारच असते!
किरर्र 
संकलन 

Sunday, March 31, 2013

मृत्यू...

मृत्यू...
 
किती हि वाटलं तरी ज्याची भेट टाळता येत नाही असा.
'आहे' ला 'होतं' करणारा,वर्तमानाला भूतकाळ बनवणारा.
बोललेलं एखादं वाक्य 'शेवटचं' ठरवणारा.
वाक्यामागे स्वल्पविराम लावावा कि अल्पविराम लावावा                                                                                                             ह्या संभ्रमात असतानाच अचानक येऊन पूर्णविराम लावणारा.

अंत म्हणजे आयुष्य आणि अनंत यांमधली एक सूक्ष्म रेषा.
एका भेटीतच या अंताच्या अलिकडचे पलीकडले होऊन जातात.
हिशोब थांबवणारा, जगणं लांबवणारा...
घराला किती हि मजबूत दारं लावली तरी त्यांना न जुमानणारा.

मृत्यू काहीतरी देऊन जातो कि काही घेऊन जातो?
वर्षानुवर्षे अडगळीत असेच पडून राहिलेल्या खटल्यांचा क्षणात निकाल लावणारा..
मृत्यूला पर्याय नसतात आणि नियम हि नसतात.
क्षणात आयुष्याला परकं करणाऱ्या मृत्यूला कधीच परकं करता येत नाही.
तो आपला आयुष्यभर पाठलाग करतो...अगदी मनापासून...आपल्या सावलीसारखा
मृत्यू अफाट असतो...आभाळाएवढा...
 किरर्र 
(संकलन )

Tuesday, March 26, 2013

मामाचं पत्र हरवलं !

 
 मामाचं पत्र हरवलं  !
पूर्वेकडुन..पश्चिमेकडे....
ज्या वयात शुभम् करोती म्हणायची त्या वयात...जॉनी जॉनी येस पापा म्हटल जातय......
माझ्या मामाच पत्र हरवलं म्हणत,
रिंगण घालुन तालासुरात फेर धरायचो पण आता कम्प्युटर मोबाईल्सच्या गेम्सच्या जमान्यात मामाच पत्र खरच हरवलय....
त्रिकोणी-चौकोनी कुटुम्बात "आजीच्या गोष्टी" हरवल्यात....
सुट्टीमध्ये मामाच गाव नक्की असायच.....पण हल्ली सुट्टीच नाही मिळत...शाळेला मिळाली तरी क्लास्स सुरुच असतात....आणि मिळालीच तरी जवळच्या डेस्टीनेशन वर घालवली जाते.......
फेसबुकवर वॉट्सएप वर रोज 10 जणांना "हाय" "हाउ आर यु" विचारणारे आपण........एकदाच आईला "कशी आहेस...." म्हणुन विचारतो का.....?
फेसबुक...वर तास तास गप्पा मारणारे आपण घरात एकत्र गप्पा मारायला बसतो का..?
7 ते 10 रुपयाच्या सिगरेट ...दिवसाला दहा दहा वेळा ओढताना....वाटत नाही का कुठे तरी चुकतोय आपण....?
हल्ली एन्जॉयमेन्टची डेफीनेशन बदलली आहे......दारु पिणे....नशेत गुंग होणे म्हणजे एन्जॉयमेण्ट....
ओबमा म्हणाले होते अमेरिकेसमोरची सगळ्या मोठी समस्या म्हणजे वाहवत चाललेली तिथली तरुण पीढी........आपणही त्याच मार्गावर आहोत का...?
विवेकानंदांचा तरुण भारत वाहवत चाललाय.....
गरज आहे जगण्याचा पाया आणि चालण्याचे बळ देणा-या  तुकारामांच्या अभंगाची...
गरज आहे सावरकरांच्या राष्ट्रवादी विचारांची......
गरज आहे छत्रपती शिवाजींना मनात रुजवण्याची.....
गरज आहे
पूर्वेकडुन..पश्चिमेकडे  चाललेला हा प्रवास इथेच थांबवण्याची.....
किर्रर  
(संकलन)

Monday, March 18, 2013

आज एक चिमणी स्वप्नात आली ... !

आज एक चिमणी स्वप्नात आली ... !

चिव चिव चिवचिवली ... अख्खं लहानपण लख्ख जागं करून गेली ... !
मी म्हटलं ... कधीतरी खिडकीत येत जा की गं ... माझ्या मुलाला पहायचंय तुला ... !
 
मी असं म्हणताच खुदकन हसली ... म्हणाली .. सिमेंटच्या जंगलातल्या त्या कॉन्क्रीटच्या माणसांत आता मन रमत नाही माझं .. ! 
इतकं म्हणून पुन्हा चिवचिवली ... दोन पायांत घट्ट धरलेला शेंगदाणा हलकेच माझ्या ओठांत भरवला ... नि ओल्या स्वरात म्हणाली .. हा शेवटचा 'चिऊ' चा घास ! यानंतर मी तुला चिमणरावांच्या गोष्टीत भेटेन नाहीतर मग तुझ्या मुलाच्या सामान्य विज्ञानाच्या पुस्तकात .. असं म्हणून भुर्रकन उडाली ... ! 
मी दचकून डोळे उघडले नि समोरची रिकामी खिडकी बघून सुन्न झालो .. खिडकीच्या चौकटीवर जमलेल्या धुळीत चिमणीच्या पायाच्या खुणा उमटल्या होत्या .. त्या पाहिल्या आणि तेव्हा जाणवलं ... येणाऱ्या पिढीनं नेमकं किती आणि काय गमावलंय ते ... !
किर्रर 
(संकलन)

Saturday, March 16, 2013

धीर


पंढरपूर येथील पांडूरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता, तेव्हा त्याच्या मनात विचार आला कि,
"विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील, म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले, '" देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस, तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे, मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन"
त्यावर पांडुरंग म्हणाला, " ठीक आहे , पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस, काहीही झाले तरी बोलूनकोस,फक्त हसत उभा रहा" पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळ ने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडूरंगाच्या जागी उभा राहिला.
तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरु झाले,
श्रीमंत भक्त :-
"देवा मी लाखो रुपायांची देणगी दिली आहे, माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊंदे"
(त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला, पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले पाकीट तेथेच विसरला, पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पाकीट त्याला परत देऊ शकला नाही,
त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला ....... ...
(पुढे तेथे एका गरीब भक्ताचे येणे झाले )
गरीब भक्त:- "पांडुरंगा, हा एक रुपया मी तुला अर्पण करतो, माझी हि धनाची सेवा स्वीकार कर. तसेच
मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव,माझ्याकडून तुझीभरपूर सेवा करून घे.. .....
देवा माझी बायको व मुले २ दिवसांपासून उपाशी आहेत, घरात अन्नाचा कण नाही,
माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे, जे काही होईल ते तुझ्या इच्छे प्रमाणे होईल असा मला विश्वास आहे"
( असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे पैशांनी भरलेले पाकीट दिसते, तेव्हा देवाचे आभार मानून तो ते पाकीट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला, मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो..... ...गोकुळ काहीच न बोलता हसत उभाच असतो )
पुढे तिथे एक नावाडी येतो, देवाला उद्देशून तो म्हणतो, " हे पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे, तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे "
(असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलीसांना घेऊन तिथे येतो, तिथे पाकीटनसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकीट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो... .....
(तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो )
तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, " पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस,मी काहीच नाही केले तरी मला हि शिक्षा"
(हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते, तो विचारकरतो कि स्वत: पांडुरंग जरी इथे असला असता तरी त्याने काहीतरी केले असते, असे म्हणून न राहवून तो पोलीसांना सांगतो कि, " पाकीट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे" .....त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात, तेव्हा नावाडी व श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात.)
रात्री पांडुरंग मंदिरात येतो व गोकुळाला विचारतो "कसा होता दिवस?"
गोकुळ म्हणतो , " पांडुरंगा मला वाटले होते कि इथे उभे राहणे फार सोपेकाम आहे,
पण आज मला कळले कि हे काम किती अवघड आहे ते, ह्यावरून कळते कि तुझे दिवस हे सोपे नसतात" ..... ..
पण देवा मी आज एक चांगले काम पण केले, असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो.
तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, " शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास,तुला मी सांगितले होते कि तू कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस, तुझा माझ्यावर (देवावर) विश्वासच नाही. .......
तुला काय वाटते कि मी भक्तांच्या ह्रुदयातील भावना ओळखू शकत नाही ???" .......
गोकुळ मान खाली घालून उभा राहतो .... ......
पांडुरंग पुढे म्हणतो ....... ..
अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते,
आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसाया मध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती.
त्यामुळे पाकीट हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील
पापाचा साठा कमी होणार होता.त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकचरुपया राहिला होता, तरी देखील
श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला. म्हणून पैशांचे पाकीट मीत्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त
गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे.
त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता, तेथील
वातावरण आज खूप खराब आहे, मोठमोठ्या लाटा जोराने वहात आहेत, ह्या परिस्थितीत
तो आपली नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता, म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल.
पण तुला वाटले कि आपण एक दिवसाचा पांडुरंग झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो, पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस, आणि नेहमी जे होते तेच आजपण झाले .... .
"देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्यच त्यावर पाणी सोडतो"
तात्पर्य :- देव जे काही करत आहे ते फक्तआपल्या चांगल्यासाठीच करत आहे......
फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहीजे.

किर्रर 
(संकलन)

जिवदान


 जिवदान

सायंकाळी  समुद्रकाठी फ़िरताना एका वृद्धानं एका लहानग्याला किनार्‍यावर काहीतरी उचलून समुद्रात फ़ेकताना पाहिलं.आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर तो समुद्राकाठचे तडफ़डणारे मासे एक-एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता.
 न राहावून त्यानं लहानग्याला विचारलं, "समुद्रकिनारी इतके हजारो मासे आहेत, तू  कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस ??..
मुठभर मासे वाचवून जगाला असा काय फ़रक पडणार आहे?"
 त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं, "यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही, पण त्या  माशाला विचारा, "त्याला काय फ़रक पडला?" ज्याचा मी नुकताच जीव वाचवला....!

किर्रर 
(संकलन)